About Images

माहिती - मंदिर इतिहास

नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसास पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्‍याच सात्विक लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १०x१० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता. मानवावर धार्मिक व अध्यात्मिक जीवनाचे संस्कार करणारे साधन म्हणून मंदिराचा धार्मिक पीठासारखा उपयोग व्हावा ही मंदिरे उभारण्या मागील महत्वाची कल्पना आता सर्वमान्य ठरलेली आहे. इतिहासकालीन भारतामध्ये सर्वठिकाणी मंदिरे बांधण्याची कल्पना झालेली असुन विशेषत; महाराष्ट्रामध्ये मराठे पेशवे सरदार राजे महाराजे यांनीही त्यांचा पुरस्कार करून ठिकठिकाणी मंदिरे, बारव, वाडे, धर्मशाळा, घाट हजारो लाखो रूपये खर्च करून केलेले आहे व आपली किर्ती अजरामर करून ठेवलेली आहे. परंतु हल्ली आता त्यावेळची मंदिरे व धर्मशाळा, घाट आज जीर्ण झाल्यामुळे जीर्णोध्दारासाठी भाविकांची मनधरणी करु पाहत होती. व त्यामधुनच सदर श्री कालिका देवीच्या मंदिराच्या जर्णोध्दाराचा उगम झाला. स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकलान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार्यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरसाल यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.

प्रेरणा व नोंदणी

मंदिराचा आतील भाग अतीशय लहान व बाहेरील सभामंडप पत्र्याचा आणि लहान असल्याने यात्रेच्या वेळी लोकांना दर्शनासाठी अत्यंत त्रास होऊ लागला त्यामुळे गावातील भाविक, दर्शनार्थी लोक मंदिराचा विस्तार करण्याची मागणी करु लागले ही मागणी रास्त असल्याने मंदिर विस्तार करण्याचा विचार विश्वस्त करु लागले.स्वराज्य प्राप्ती नंतर सरकारने देवस्थान व धार्मिक ट्रस्टसाठी सार्वजनिक (पब्लिक) ट्रस्टसाठी कायदा करुन सदरचे देवस्थान पब्लिक ट्रस्टच्या स.न. १९५० सालच्या अँक्टखाली नोंदवुन सार्वजनिक ट्रस्ट नं.३२६ अ देऊन (कैं.) कृष्णराव पाटील, (कैं.) शंकरराव पवार, (कैं.) रामचंद्र तळाजिया या ट्रस्टींची नेमणूक केली व हक्कदारांचे उत्पन्न घेण्याचे हक्क नष्ट केले व देवस्थानचा कारभार ट्रस्टींच्या स्वाधीन केला. काही वर्षाच्या अंतराने सदर ट्रस्टी दिवंगत झाल्याने श्री. गुलाबराव कृष्णराव कोठावळे, श्री. मगनभाई बापूभाई तळाजीया, श्री. भूपतभाई रामचंद्र कोठावळे, श्री. बाळासाहेब विनायक कोठावळे, श्री. पंडीतराव जयवंतराव पवार या ट्रस्टींची नेमणुक करण्यात आली व त्यांनी तना मनाने ट्रस्टसाठी अतिशय पारदर्शी असा कारभार केला व हिशोब दरसाल सरकारी ऑडिटर कडून ऑडिट करुन मे.चारिटी कमिशनरला सादर करत गेले.

सध्याचे मंदिर उभारणी व सुधारणा

स.न. १९०० पर्यत मंदिर व सभामंडप फारच लहान होता व जीर्ण होत होते तसेच दर्शनासाठी फारच त्रास होत आहे अशा यात्रेच्यावेळी भाविकांच्या तक्रारी ट्रस्टींकडे येऊ लागल्या त्यामुळे मंदिराची व सभामंडपाची पुनर्रचना केल्यावाचून ट्रस्टींना गत्यंतर नव्हते. मंदिर व सभामंडप मोठा करावाच लागेल या विचाराने सध्याचे ट्रस्टी प्रेरित होऊन विस्तार करण्याचे ठरविले याकामात जनतेकडू सहकार्य व मदत मिळविण्यासाठी ट्रस्टींनी प्रयत्न सुरु केले. ट्रस्टींनी घेतलेल्या प्रयत्नांचे यश व जगदंबेच्या प्रेरणेने लोकप्रिय व प्रख्यात आर्किटेक्ट माननीय ग.ज.म्हत्रे साहेब यांनी एक नमुनेदार मंदिराचे व सभामंडपाचे डिझाईन तयार कले व तन मन धनाने आम्हास मदत करण्याचे आश्वासन दिले. मंदिराची साईज १८x१८ चा गाभारा व ३० फूट उंच शीखर, सभामंडप ४०x६० व त्याच्यापुढे यज्ञशाळा व त्यावर छत्री असे काम करण्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत खर्च येणार होता. एवढा खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न ट्रस्टींना सतावत असतांना मातेने प्रेरणा दिली की, काम सुरु करा काहीही कमी पडणार नाही. मातेच्या प्रेरणेने आणि सतकार्याला ईश्वर सहाय्य करतो हि प्ररणा समोर ठेऊन ट्रस्टींनी काम सुरु केले आणि जगदंबेच्या कृपेने ट्रस्टींने पाहिलेले स्वप्न साकारु लागले. दर्शनार्थी, धार्मिक मंडळी, भाविक तसेच यात्रेस येण्यार्‍या लाखो लोकांचे मदतीचे हात सरसावले व कामाला जोम आला. सन १९७४ सालात दिनांक २०-१२-७४ मार्गशिर्ष शुध्द षष्टी (चंपाषष्टी ) या शुभमुहूर्तावर नाशिकचे सुप्रसिध्द नगराध्यक्ष (कै.) डॉ. वसंतराव गुप्तेसाहेब यांच्या हस्ते सपत्निक भुमिपुजनाचा कार्यक्रम थाटात करण्यात आला व ट्रोयो बिल्डर आणि बेरी अन्ड बेरी यांनी जानेवारी १९७५ बांधकाम कामकाज सुरु केले. मंदिराच्या आवारात शहाबादी फरशी बसविण्यात आली व दोन्ही बाजूचे रस्ते कॉक्रिट करण्यात आले. श्री. आण्णा कमोद यांनी पाणपोई तर श्री. पोद्दारबंधु यांनी कमानी उभारुन सहकार्य केले. मंदिराच्या उजव्या बाजूस मोठा सभामंडप व धर्मशाळा प्रवचन हॉल उभारण्यात आला. सन १९७४ पासुन ते १९८१ पर्यत बरोबर ६ वर्षांनी अगदी कला-कुसरीने नटलेले मनोहर, होडीच्या आकाराचे विशाल मंदिर व सभामंडप याचे कामकाज पूर्ण झाले व परिसरही सुशोभित करण्यात आला हे आजही आपणास बघावयाला मिळते. कालिका मातेच्या मंदिरात १५० किलो चांदिचे मखर करण्यात आले. मंडपाकरीता प्रथम अण्णा पाटील, सुभाष तळाजीया यांनी सव्वा किलो चांदी दिली तसेच सर्व ट्रस्टींनीही यात मदत केली. चांदीच्या मखरावरील अतिशय सुंदर कलाकुसर नाशिक येथील बाफना ज्वेलर्स यांनी केली आहे. महापौर निधीतून विनायक पांडे यांनी ५० लाखाचा निधी मंदिराचा बगीचा नुतनीकरन व भव्यगेट उभारणीसाठी दिलेला असुन त्याचे काम सुरु आहे.