रोज पहाटे २ ते ४ या वेळेत गुलाबपाणी, पंचामृत, शुध्द पाण्याने देविचा अभिषेक करुन साडी नेसवली जाते व पूर्ण साज शृंगार केला जातो. रोज सकाळी ६ वाजता व संध्याकाळी ७ वाजता आरती केली जाते. हे सर्व मंदिराचे पूजारी करतात. मंदिरात प्रत्येक महिन्याच्या पौर्णीमेला प्रसाद म्हणून शिरा वाटला जातो. सभागृहात कायम कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम वर्षभर होत असतात. गायत्री महायाग चैत्र शुद्ध दशमी दि. २ एप्रिल ९३ ते चैत्र शुद्ध पौर्णिमा ७ एप्रिल ९३ पर्यत आयोजीत करण्यात आला होता. या यागात पासष्ट लक्ष गायत्री मंत्र संकल्पसिद्धीसाठी ६५ हजार आहुतीचा हा गायत्री महायाग करण्यात आला. त्या प्रसंगी नाशिकचे श्री. गणेशबाबा, श्री. माधवगिरी महाराज उपस्थित होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नवरात्रात पहाटे ४ वाजता विश्वस्त व मानकरी यांच्याकडून घटस्थापत येते. नवरात्रात दररोज सकाळी ७ ते ९ या दरम्यान महापौर, आमदार, मंत्री यांच्या हाताने पूजा व आरती केली जाते. नवरात्रात रोज गावातील आरती मंडळे येतात आणि मोठी महाआरती केली जाते. पंचमी ते षष्ठीपासून देविला फुलोर्‍यासाठी कडकण्या वाहतात. नवरात्रात सप्तमीच्या दिवशी हजरो भाविकांच्या अंगी संचार होतो. ते घागरी फुंकतात. अष्टमीच्या दिवशी होमाकरीता सर्व विश्वस्त मंडळी बसतात. दशमीच्या दिवशी सीमोलंघनाचा कार्यक्रम होतो. कोजागिरी पौर्णीमेला आटवलेले दूध व केशरी भाताचा प्रसाद दिला जातो. मंदिरात विश्व कल्याणासाठी यज्ञ ही होत असतात. सन २००४ साली गायत्री याग झालेला आहे. २००८ साली शतचंडी यज्ञही करण्यात आलेला आहे. तसेच दरवर्षी नवरात्रात जवळपास ५० ते ६० पोते धान्य येते. आलेले सर्व धान्य गरीबांना तसेच अंधशाळा, रिमांड होम, प्रबोधन मंदिर, स्त्री आधार केंद्र, कर्ण बधिरांची शाळा, अनाथ बालकाश्रम यांना दान करण्यात येते. आलेल्या दानातून सन २००६ ते २००९ या तीन वर्षातल्या कालावधीमध्ये कालिका मातेच्या मंदिरात १५० किलो चांदिचे मखर करण्यात आले. आज पर्यत संस्थेने भूकंपग्रस्तासाठी मदत, सिडको परिसरात संस्थेने विनाअनुदान तत्वावर बालवाडी, प्राथमिक वर्ग सुरु केले आहेत. तसेच टेक्निकल स्कूल, अभियांत्रिकी कॉलेज, धर्मार्थ दवाखाना, रुग्णवाहिका काढण्याचा संस्थेचा मानस आहे.